Ad will apear here
Next
श्री कसबा गणपती
कसबा गणपती

लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी १८९३मध्ये पुण्यात सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला यंदा १२५ वर्षे होत आहेत. त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज महावृक्ष झाला आहे. काळानुसार या सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले असले, तरी श्रद्धा कायम आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यनगरीतल्या मानाच्या पाच आणि अन्य महत्त्वाच्या पाच मंडळांची, माहिती आपण आजपासून घेणार आहोत. पहिला मान अर्थातच कसबा गणपतीचा...
..........
कसबा पेठेतील कसबा गणपतीचे मंदिरपुण्याच्या कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती म्हणजे कसबा गणपती. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांनी हे देऊळ बांधले. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या एका कुटुंबाने कसबा गणपतीची स्थापना केली. हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून, तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. आज या मंदिरात असलेल्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहे. जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे.. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.

लोकमान्य टिळकसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 
१८९३मध्ये कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली. या गणपतीला मिरवणुकीत पहिले स्थान असते. १८९३ला पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला. शिवकालीन कसबा गणपती मंदिर हे पुण्याचे ग्रामदैवत झाले. या वेळीच तत्कालीन ‘रे’ मार्केटमध्ये असलेल्या या मंदिरातदेखील उत्सव सुरू झाला. अॅ्ड. दंडवते, अॅयड. भाऊसाहेब निरगुडकर या सुरुवातीच्या अध्यक्षांनी स्वतःला या गणेशोत्सवाच्या कामात झोकून दिले. पुढच्याच वर्षी मिरवणुकीदरम्यान कोणता गणपती पुढे असावा, असा प्रश्न निर्माण झाला असता स्वत: लोकमान्य टिळक आणि अण्णासाहेब पटवर्धन यांनी ‘कसबा गणपती हे शहराचे ग्रामदैवत आहे, म्हणून त्यालाच अग्रक्रम दिला गेला पाहिजे,’ ही भूमिका मांडली. तेव्हापासून कसबा गणपती मिरवणुकीच्या अग्रभागी असतो. 


मंडळाचे वेगळेपण 
स्थापनेपासूनच या मंडळाने आजवर आपले वेगळेपण कायम जपले आहे. केवळ गणपतीचे दहा दिवसच नाही, तर वर्षभरातही मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. केवळ धार्मिक कार्यच नाही, तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच कार्यांत मंडळ आपला सक्रिय सहभाग नोंदवत असते. गणपती उत्सव काळात मंडळातर्फे होणाऱ्या विविध उपक्रमांतील महिलांचा सहभाग हे मंडळाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सव काळातील एका संपूर्ण दिवसाची जबाबदारी महिला सांभाळतात. त्या दिवशी अगदी पौरोहित्यापासून, सनई चौघडा, भाविकांचे स्वागत आणि दिवसभराची इतर सर्व व्यवस्था महिला पाहतात. पुण्यात असा उपक्रम सुरू करणारे हे पहिलेच मंडळ आहे. 

गणपती मिरवणुकीचा रथयाशिवाय अत्यंत शिस्तबद्ध अशी मिरवणूक हे या मंडळाचे आणखी एक ठळक आणि वेगळेपण अधोरेखित करणारे एक वैशिष्ट्य आहे. श्रींची मिरवणूक पालखीमधून असते. ही पालखी भाविक व कार्यकर्ते आनंदाने आपल्या खांद्यावरून वाहतात. मोठ्या जल्लोषात निघणाऱ्या या मिरवणुकीत महिलावर्गदेखील मोठ्या संख्येने सहभागी होत असतो.

इतर सामाजिक उपक्रम
गणेशोत्सवाव्यतिरिक्त वर्षभर इतर अनेक सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. दर वर्षी मंडळातर्फे गरीब मुलांना आर्थिकरीत्या दत्तक घेतले जाते. त्यांचा सर्व खर्च केला जातो. याशिवाय महिलांच्या सबलीकरणासाठी हातभार लावला जातो. मंडळातर्फे दर वर्षी महिला दिन साजरा केला जातो. सामाजिक कार्यात मंडळाचा नेहमीच सहभाग असतो. किल्लारी भूकंप, भूज भूकंप, तसेच अन्य नैसर्गिक आपत्तींच्या दरम्यान मंडळांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात सहभाग घेतला आहे. अशा ठिकाणी अनेकदा मंडळाने वस्तुरूपाने मदत केली आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्याचाएक भाग म्हणून कामायनी संस्थेतील मतिमंद मुलांना मिरवणुकीत सहभागी करून घेऊन त्यांच्याबरोबर मिरवणुकीचा आनंद लुटून मंडळाने एक वेगळी प्रतिमा तयार केली आहे. 

तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान यांवर आधारित अतिप्राचीन पुस्तकांचे संग्रहालय असलेली पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था. या संस्थेचे ग्रंथालय काही कारणांनी २००५मध्ये उद्ध्वस्त झाले होते. तेव्हा कसबा सार्वजनिक गणेश मंडळाने भांडारकर संस्थेला हे ग्रंथालय पूर्ववत करण्याच्या कामात मोठी मदत केली होती. तसेच वर्षभरात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची काही शिबिरे व रक्तदान शिबिरे मंडळामार्फत आयोजित केली जातात. 

मंडळाची कार्यकारिणी  
श्रीकांत शेटे हे सध्या मंडळाचे अध्यक्ष असून, अनिल रूपडे हे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय नीलेश वकील, अक्षय देहेरे, केदार देशपांडे, भूषण रूपडे, वैशाली देशपांडे, दीपा तावरे, विशाल चौधरी, मंदार देशपांडे आणि सचिन म्हसवडे हे सर्व जण मंडळाच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. 

विसर्जन मिरवणूकगणपती विसर्जन 
दर वर्षी गणेशोत्सवात या मंडळाचा गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि मग तो विसर्जित केला जातो. कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक हादेखील एक नयनरम्य सोहळा असतो. मानाचा पहिला गणपती असल्याने विसर्जन मिरवणुकीत हा गणपती सर्वांत पुढे असतो. पुण्याचे महापौर आणि आयुक्त कसबा गणपतीच्या विसर्जनावेळी उपस्थित असतात. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषात बाप्पांची विसर्जन मिरवणूक पार पडते.

वेबसाइट : http://www.kasbaganpati.org
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ShriKasbaGanpati/


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZDGBF
Similar Posts
केसरीवाडा गणपती.. ज्या लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्यांच्या केसरीवाड्यातील गणपती हा पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी पाचवा गणपती आहे. त्या गणपतीबद्दल...
उत्सवातील कोहिनूर; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुण्याच्या गणेशोत्सवातील जणू कोहिनूरच ठरला आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. कारण पुण्याचा गणेशोत्सव बघायला केवळ देशभरातूनच नव्हे, तर परदेशातूनही लोक येतात. पुण्यात आलेला कोणीही गणेशभक्त दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय पुणे सोडतच नाही, हेही तेवढेच सत्य आहे. या गणपती मंडळाबद्दल
मंडईतला शारदा गजानन पुण्यातील गणेशोत्सवामध्ये जी महत्त्वाची मंडळे आहेत, त्यापैकी एक म्हणजे अखिल मंडई मंडळ. शारदा गजाननाची सुरेख मूर्ती हे या मंडळाचे वैशिष्ट्य. या मंडळाबद्दल...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; गुरुजी तालीम गणेश मंडळ पुण्यातील गुरुजी तालीम गणेश मंडळाचा गणपती मानाचा तिसरा आहे. यंदा या मंडळाचे १३१वे वर्ष आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या गुरुजी तालीम गणेश मंडळाचे पुण्याच्या गणेशोत्सवातील महात्म्य अन्यन्नसाधारण आहे. या मंडळाबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language